तमसो मां ज्योतिर्गमय – गुरुत्वाकर्षणच्या मदतीने!

Gravity Light

Gravity Light

आजसुद्धा जगातले जवळ जवळ १५० कोटी लोक वीज पुरवठ्या पासून वंचित आहेत. आपल्या प्रकाशाच्या गरजेकरता ह्यांच्यापैकी बहुतेक सर्वजण केरोसीन च्या ढणढणत्या चिमण्यांचा वापर करतात. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार, ह्या धुरामुळे सुमारे ७८ कोटी बायकामुलांच्या आरोग्यावर, रोज दोन पाकिटे सिगारेट ओढण्या इतका दुष्परिणाम होतो. जगाच्या ह्या भागात फुफुसाच्या कर्करोगाने पिडीत ६० टक्केस्त्रिया धुम्रपान न करणाऱ्या आहेत! ह्या धुराने मोतीबिंदू सारखे डोळ्याचे विकार तर होतातच, पण चिमणी उलटून आगीसारख्या दुर्घटना सुध्धा मोठ्या प्रमाणावर होतात. ह्याच्या शिवाय चिमणी करता लागणाऱ्या इंधनाचा खर्चही खूप असतो. आपण कल्पनाही करू शकत नाही कि एका गरीब कुटुंबाची १० ते २० टक्के मिळकत ह्याचा करता खर्ची पडू शकते. पर्यावरणाची जी हानी होते ती तर वेगळीच. उजेडा करता जाळले जाणारे हे रॉकेल वर्षाला २४ कोटी टन ग्रीन हाउस वायू वातावरणात सोडतात.

सर्वसाधारणपणे सौर उर्जेचा वापर हा ह्या परिस्थिती वर रामबाण उपाय समजला जातो. पण सौर उर्जेच्या सार्वत्रिक वापरलाही अनेक अडचणी आहेत. जेंव्हा सुर्य आकाशात तळपत असतो, तेंव्हाच panels वापरून उर्जा उत्पन्न केली जाते. पण प्रकाशा करता ती उर्जा सुर्य नसतांना वापरायची असते. म्हणजे तिची साठवणूक करणे भाग पडते. त्या करता batteries लागतात. ह्या सर्वांकरता मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. आजघडीस जगातल्या हजारो लोकांना सौर उर्जा प्रकाश पुरवते, पण ह्या भांडवली खर्चामुळे उजेडकरता सौर उर्जेच्या वापराचा प्रसार पुरेशा वेगाने होत नाही. ह्या शिवाय batteries चे आयुष्य मर्यादित असते, आणि बदलण्याचा खर्च अधिक. त्यामुळे सौर ऊर्जाही अक्षय प्रकाश पुरवू शकत नाही. मग ह्यावर उपाय? गुरुत्वाकर्षण!

२००८ साली सोलरएड चे भूतपूर्व डायरेक्टर Nick Sireau आणि सोलर फॉर आफ्रिका ह्या blog चा लेखक John Keane हे एका कमी खर्चिक सोलर दिव्याकरता लंडन मधल्या Therefore नावाच्या डिझाइन कंपनीला भेटले. सोलर दिव्यामध्ये Batteries आणि Panels हे सर्वात महाग घटक आहेत हे Therefore च्या टीमने ओळखले आणि मग शोध सुरु झाला पर्यायांचा, एका नव्या उर्जास्त्रोताचा.

एका पडत्या सफरचंदाला पाहून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली आणि त्याने सर्वकष गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (law of universal gravitation) मांडला. जगातल्या सर्व वस्तू एकमेकांना आकर्षित करतात, हा तो सिद्धांत. वर फेकलेली वस्तू, मग ती कितीही जड किंवा हलकी असो, खाली येतेच, हे त्याचे नेहमीच्या बघण्यातले स्वरूप. गुरुत्वाकर्षण सर्वव्यापी आहे. ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती जर वापरता आली, तर अक्षय प्रकाश हे स्वप्न न राहता प्रत्यक्षात आणता येईल. Martin Riddiford आणि Jim Reeves ह्या Therefore च्या दोन डिझाईनर्सना ह्या विचाराने झपाटून टाकले. आणि मग सुरु झाला चार वर्षांचा खडतर प्रवास. आता चार वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी बनवला आहे “Gravity Light”, गुरुत्वाकर्षणने चालणारा दिवा!

हा दिवा छताला किंवा खुंटीला टांगावा लागतो. दिव्याला खाली एक लोंबणारी वजनदार थैली असते. (वापरत नसेल तेंव्हा हा दिवा ह्या थैलितच pack करता येतो.) जेंव्हा उजेड हवा असेल, तेंव्हा हे वजन हाताने उचलून सर्वात वरच्या, ठरवलेल्या जागी न्यायचे, आणि मग हात बाजूला करायचा. आता वजनावर गुरुत्वाकर्षण काम करू लागते आणि त्याला खाली ओढू लागते. ह्या ओढीमुळे गिअर्स फिरू लागतात. एक dynamo ह्या हालचालीचे रुपांतर विजेत करतो आणि ह्या विजेने एक LED बल्ब पेटतो. वजन खाली येण्यास साधारण ३० मिनिटे घेते. तेवढा वेळ दिवा पेटत राहतो. त्या नंतर वजन परत वर उचलायचे. वजन उचलायला साधारण ३ सेकंद लागतात. म्हणजे ३ सेकंदाच्या मेहनतीत ३० मिनिटे प्रकाश! ना batteries ची आवश्यकता, ना त्या बदलण्याची. विसरू नका कि हे दिवे केरोसीनच्या चिमणीचा पर्याय आहेत आणि एका केरोसीनच्या चिमणी इतकाच उजेड देतात.

आत्ता जे “Gravity Light” तयार आहेत ते नमुन्या दाखल आहेत, संकल्पना सिद्ध करण्यासाठी. जरुरी आहे ती बहुत्पादानाची, mass production ची. संशोधकद्वयीला खात्री आहे कि मोठ्या प्रमाणावर बनवल्यास एका Gravity Light ची किंमत २५० रुपयाच्या आसपास असेल. ह्याचा अर्थ, साधारणपणे ३ ते ६ महिन्याच्या केरोसिनच्या खर्चाइतकी. त्याच्यानंतर सर्व बचत. पण बहुत्पादन करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज लागते. ह्या संशोधकांनी हि गरजही मोठ्या कल्पकतेने सोडवली. सामाजिक गुंतवणुकीनी, crowdfundingनी. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना ह्या प्रकल्पाकरता पैसे देण्याचे आवाहन केले, आणि त्यांना भरभरून प्रतिसादही मिळाला. त्यांचा उद्देश १००० दिवे बनवून आफ्रिका आणि भारतात प्रायोगिक तत्वावर पुरवण्याचा होता आणि त्या करता त्यांना ५५,००० $ ची गरज होती. ती तर काही दिवसातच भागली. आजपर्यंत (Dec २६), त्यांनी $२६०,००० गोळा केले आहेत आणि ते १५ जानेवारी २०१३ पर्यंत देणग्या स्वीकारत आहेत. माझ्या तर्फे त्यांना अनेक शुभेच्छा.

जर आपल्याकडे क्रेडीट कार्ड असेल, तर आपणही ह्या कार्याला हातभार लावू शकता.अधिक माहितीकरता http://bit.ly/TTgVSd

हाच लेख रविवार ३० डिसेंबर च्या महाराष्ट्र टाइम्स च्या अंकात पान तेरा वर प्रकाशाचे गुरुत्त्वाकर्षण! म्हणून प्रसिद्ध झाला. जागेच्या आभावी तो थोड्या संक्षिप्त स्वरुपात होता.

This entry was posted in General, News, Science / Technology, Weird, Unusual and tagged , , . Bookmark the permalink.

9 Responses to तमसो मां ज्योतिर्गमय – गुरुत्वाकर्षणच्या मदतीने!

  1. Shefali says:

    Writing this article in Marathi, has helped many Marathi people to read it and undersgtand it easily. Thanks Makarand! I am sure one day, MaTa will publish – “Makarandache bol – Sangrahit lekh”

  2. Dinesh says:

    Good article and an excellent idea. I loved the concept. Thanks for sharing it.

  3. mbpackard@aol.com says:

    how can i get this in english?

  4. Good to see the post, had thought of this long back, dint get time to implement. The efficiency of this product could be doubled by implementing spring tension in reverse.

Leave a comment