आम्ही साहित्ययात्री

img_20191124_140708नुकताच मी माझ्या कुटुंबियांबरोबर, मराठी वाचकांसाठी असलेल्या एका साहित्य स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे नाव होते साहित्ययात्री 2019. आणि मग सुरु झाली आमची एक अभिनव साहित्य यात्रा. त्या यात्रेची ही कहाणी.

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला मला मुकुंद करकरेचा, माझ्या एका स्नेह्याचा, फोन आला. त्याने मला या स्पर्धेबद्दल सांगितले, आणि मी या स्पर्धेत भाग घ्यावा असे सुचवले. गेल्या पंचवीस वर्षात, कमी झालेल्या मराठी वाचनामुळे, मी सुरुवातीला जरा टाळाटाळच केली. पण तो बधला नाही. फोन करून मला सहभागाबद्दल विचारत राहिला. मी मागेन ती माहिती देत राहिला. शेवटी आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला याला कारण म्हणजे मुकुंदाची चिकाटी! (स्पर्धेबद्दलची माहिती)

स्पर्धा सांघिक होती, त्यामुळे सगळ्यात पहिली जबाबदारी होती संघ बनवण्याची. माझ्याकरता संघ बनवणे तसे कठीण नव्हते. पहिली दोन नावं सुचली ती म्हणजे माझ्या बहिणींची, मृदुला आणि उज्वला. आम्ही लहानपणापासूनच पुस्तके वाचत होतो. बॉम्बे बुक क्लबचे मेंबर बनून, दर महिन्याला दहा रुपये भरून, वर्षाच्या शेवटी दीडशे रुपयांची पुस्तके घेत होतो. दिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी पुस्तके विकत घेत होतो. चौथा मेंबर माझी धर्मपत्नी गीता. ती तर मराठी विषय घेऊन रुईया कॉलेजमधली पदवीधर.  पाचवा मेंबर म्हणजे माझे व्याही सुधीर ताटके. ते पण रुईया मधले, कला शाखेचे पदवीधर आणिक वाचन, नाटके इत्यादी गोष्टींची प्रचंड आवड असलेले. पु. ल. आणि व. पु. काळ्यांचे प्रचंड मोठे चाहते.

संघ बनला आणि नेहेमीप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणी रजिस्ट्रेशन करून आम्ही स्पर्धेत सामील झालो.  आयोजकांकडून रीतसर पोहोच मिळाली आणि आमच्या संघाला “पु. ल. देशपांडे संघ” असे नाव संयोजकांनी दिले. पु. ल. देशपांडे यांचं नाव आमच्या संघाला मिळाल्यामुळे आम्ही अत्यंत खूष झालो. शेवटी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वच ते! आम्ही लहान असतानाचे आमचे वाचनाचे अगदी “स्टेपल डाएट”.  ह्या प्रकारे आम्ही त्यांच्या नावाशी संलग्न झालो आणि खूप मस्त वाटले. सुधीरच्या शब्दात सांगायचं तर “अरे पुलंच नाव मिळालं, म्हणजे आपण तर अर्धी लढाई जिंकलीच!”.

संयोजकांनी सगळ्या स्पर्धकांचा आणि संयोजकांचा एक whatsapp ग्रुप बनवला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहणे अगदीच सोप्पे झाले. आम्हीही आमच्या संघाचा एक whatsapp ग्रुप बनवला.

यथावकाश, संयोजकांकडून स्पर्धेचे स्वरूप कळले. स्पर्धा दोन तुकड्यात विभागली होती. पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंग होता 19 ऑक्टोबरपासून चार आठवडे आणि उत्तररंग होता 24 नोव्हेंबरला डोंबिवली येथे संपूर्ण दिवसभर!  पूर्वरंगांमध्ये आम्हाला दर आठवड्याला शनिवारी एक टास्क दिला जाणार होता आणि तो टास्क पुढच्या शनिवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचा होता. (स्पर्धेचे स्वरूप)

आता आम्ही पहिल्या टास्कची प्रतीक्षा करू लागलो आणि ऑक्टोबरच्या एकोणीस तारखेला पहिला टास्क मिळाला. टास्कच नाव होतं “कलाटणी”. संयोजकांनी वीस आत्मचरित्रांची एक यादी दिली होती. त्या यादीतून एक आत्मचरित्र निवडून, त्यामधली चरित्रनायकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना निवडून, त्या घटनेबद्दल 500 शब्दात एक निबंध लिहायचा होता. (टास्कबद्दल संपूर्ण माहिती आणि नियम)

सगळीच आत्मचरित्रे खूप इंटरेस्टींग होती. त्यातली काही वाचलेलीही होती. पण आम्ही सर्वांनी अच्युत गोडबोले यांच “मुसाफिर” हे आत्मचरित्र निवडलं. हे आत्मचरित्र निवडण्यामागचे माझे वैयक्तिक कारण म्हणजे अच्युत गोडबोले हे मुंबई आयआयटीचे पदवीधर आणि नंतर आपले मूळ क्षेत्र बदलून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात गेलेले दिग्गज. माझीही करिअर याच मार्गावरून गेलेली आणि त्यामुळे गोडबोले मला स्वतःला खूप जवळचे वाटतात.

काहीच वर्षांपूर्वी मृदुलाने हे आत्मचरित्र मला भाऊबीजेच्या निमित्त भेट म्हणून दिले होते आणि त्यातल्या बऱ्याच व्यक्ती माझ्याही परिचयाच्या असल्यामुळे मी त्याची पारायणे केली होती. मृदुलाने आणि गीतानेही ते वाचलेले होते. त्यामुळे आत्मचरित्र निवडणे हा काही मोठा कठीण भाग नव्हता. आम्हाला कलाटणी देणारा प्रसंग निवडणेही फार कठीण गेले नाही. पण लिखाणात सगळ्यांचा सहभाग कसा करायचा हा एक प्रश्नच होता. त्यावर सुधीरने उत्तम उपाय काढला. आम्ही प्रत्येकाने आमच्या स्वतःच्या भाषेत आमचे आमचे विचार लिहून आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकले आणि त्यानंतर त्याचे संकलन करून आमची फायनल एन्ट्री तयार केली. (ह्या टास्कची आमची एन्ट्री)

दुसऱ्याच दिवशी पुढचा टास्क आमच्या पर्यंत येऊन पोहोचला. टास्कचे नाव होते “एक शेवट असाही”. कुठलीही एक कादंबरी निवडून, त्या कादंबरीचा लेखकाने केलेल्या पेक्षा एक वेगळाच शेवट लिहायचा होता. (टास्कबद्दल संपूर्ण माहिती आणि नियम)

आमच्या ग्रुपचे जास्तीतजास्त वाचन हे व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, self-help किंवा कथासंग्रह अशा स्वरूपाचे आहे. कादंबऱ्याही वाचनात आहेत, पण शेवट बदल करणे शक्य आहे अशी कुठलीही कादंबरी पटकन दृष्टिपथात येत नव्हती. आणि मग ध्यानात आली “विश्वस्त”. माझा प्रिय मित्र आणि सुप्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली प्रचंड मोठी कादंबरी. ह्या वसंत वसंत लिमयेबद्दल गोडबोलयांनी मुसाफिर मध्ये लिहिलेल आहे.

पुस्तकाचा आवाका प्रचंड मोठा आहे. महाभारताच्या शेवटच्या यादवी पासून ते २०१४ च्या लोकसभा निवडणुका ह्यांना व्यापणारा कालखंड, श्रीकृष्णापासून ते आजच्या आयटी क्षेत्रातल्या तरुण मंडळी पर्यंतच्या व्यक्तिरेखा, आणि अमेरिकेतल्या टेक्सासपासून ते नाशिकच्या दुर्गभांडारपर्यंत आणि युकेमधल्या एडिम्बरापासून ते श्रीकृष्णाच्या द्वारकेपर्यंत घडणाऱ्या चित्तथरारक घटना. अत्यंत अभ्यासपूर्णपणे लिहिलेली ही कादंबरी आहे.

पण ह्या कादंबरीचा शेवट बदलताना आम्हाला एक वेगळीच अनपेक्षित अडचण आली. शेवट बदलण्यासाठी कादंबरीचा मूळ शेवट एकदातरी परत वाचणे आवश्यक होते. या कादंबरीची एक प्रत माझ्याकडे आहे,याची मला पूर्ण खात्री होती. पण सगळीकडे शोधूनही ती प्रत काही मला मिळाली नाही. ती कादंबरी विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर ती सहजी उपलब्ध नव्हती. प्रकाशकाकडेही नाही आणि वाचनालयातही नाही. शेवटी आम्हाला कादंबरीची शेवटची प्रत विलेपार्लेच्या मॅजेस्टिक ग्रंथ दालनात मिळाली. आमच्या अल्पमतीने आणि एकमेकांच्या सहकार्याने आम्ही ह्या कादंबरीचा शेवट बदलला, आणि टास्क वेळेत पूर्ण केला. (ह्या टास्कची आमची एन्ट्री)

मध्येच संयोजकांकडून उत्तररंगाबद्दल एक सूचना आली. उत्तररंगांमध्ये एक झटपट फेरी असणार होती आणि त्याकरता त्यांनी दिलेल्या यादीमधून एक पुस्तक निवडून त्यांना कळवायचे होते. ह्या पुस्तकावर झटपट प्रश्न विचारले जातील असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादी मधून आम्ही “चिमणरावांचे चर्‍हाट” हे पुस्तक निवडले. ह्या निवडीमागे आमचे दोन विचार होते. एक म्हणजे बरेच दिवसांनी चि.. वि. जोशी वाचून होतील आणि दुसरा म्हणजे या पुस्तकात वेगवेगळी प्रकरणे असल्यामुळे आम्हा पाच जणांमध्ये प्रकरणे वाटून घेता येतील.

पुढचा टास्क होता “साहित्यसुहृद”.  या टास्कमध्ये आम्हाला संयोजकांनी दिलेल्या यादी मधला आमचा एक आवडता लेखक निवडून, त्या लेखकाचे एक आवडते पुस्तक निवडून, ते पुस्तक आणि त्या लेखकाबद्दल चर्चा करून, त्या चर्चेचा व्हिडीओ संयोजकांना पाठवायचा होता. (टास्कबद्दल संपूर्ण माहिती आणि नियम).

आम्ही निवडलेला लेखक होता व. पु. काळे. या निवडी मागे अर्थातच सुधीरचे एकदम जोरदार मार्केटिंग होते. आणि आम्ही निवडले त्यांचे “पार्टनर” हे पुस्तक. ह्या निमित्ताने आम्ही सर्वांनी “पार्टनर” परत एकदा वाचून काढले आणि आपापली मते लिहून काढली. आता प्रश्न होता याचा व्हिडिओ कसा बनवायचा? कारण मृदुला आणि उज्वला राहतात विलेपार्ल्याला, आम्ही राहतो बांद्र्याला आणि सुधीर राहतो मुलुंडला. सगळ्यांनी एकत्र केंव्हा आणि कुठे यायचे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कसे करायचे?

But as they say, “With internet, geography has become history.”

मी सध्या मुलांना ऑनलाइन गणित शिकवतो आणि त्याकरता “झूम” हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर वापरतो. त्यामुळे मी माझ्या घरी आणि माझे विद्यार्थी त्यांच्या घरी बसतात. कोणीही उठून कुठेही जाण्याची गरजच नाही. झूम मध्ये कॉन्फरन्स रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही ते वापरून आमची चर्चा रेकॉर्ड केली आणि ती एंट्री सुद्धा वेळेच्या आत संयोजकांकडे पाठवली. (ह्या टास्कची आमची एन्ट्री)

आत्तापर्यंत आम्हा सगळ्यांकडे चिमणरावांचे चर्‍हाट (विकत घेऊन किंवा वाचनालयातून) पोहोचले होते आणि प्रकरणांचे वाटपही झाले होते.

आणि मग आला शेवटचा टास्क, “काव्यशास्त्र विरोधेन”. सगळ्यातला “किलर” टास्क.  ह्यामध्ये आम्हाला आठ कवितांची एक शृंखला बनवायची होती. पण त्याला एक अट होती. दुसऱ्या कवितेतील भावना पहिल्या कवितेच्या विरुद्ध, तर तिसऱ्यातील दुसरीच्या, आणि चवथ्यातील तिसरीच्या इत्यादी आणि जर ह्या सगळ्या कविता एका सूत्राने बांधलेल्या असल्या तर बोनस गुण. (टास्कबद्दल संपूर्ण माहिती आणि नियम)

काही कळले? नाही ना! आम्हालाही नाही. सगळ्या संघांनी संयोजकांवर प्रश्नांचा भडिमार केला. पण संयोजकांनीही तितक्याच शांतपणे आणि संयमाने सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. इतकेच नाही तर ही स्पर्धा आहे हे विसरून, कुसुमाग्रज संघाने अशी एक शृंखला उदाहरणार्थ बनवून सगळ्या स्पर्धकांबरोबर शेअर केली आणि आम्हालाही जरासा बोध झाला.

आणि मग आमच्या संघाची रेसिडेंट कवयित्री उज्ज्वलाने ह्या राउंडचा ताबाच घेतला. मृदुलानेही तीला काहीही  हातचं न राखता सर्वतोपरी मदत केली. ह्या फेरीत इतरांचा सहभाग हा आंतरजालावर शोधाशोध करणे, शुद्धलेखनात मदत करणे इतपतच होता. सुरवातीला हार मानलेल्या आम्ही ही फेरीही वेळेत संयोजकांना पाठवू शकलो. (ह्या टास्कची आमची एन्ट्री)

आत्तापर्यंत दर शनिवारी नवा टास्क मिळण्याची सवयशी झाली होती. ह्या शनिवरीही आम्ही नकळतच पुढच्या टास्कची वाट बघत होतो. पण ह्या शनिवारी पुढचा टास्क नव्हता तर या दिवशी होती उत्तररंगच्या प्लॅनिंगकरता म्हणून डोंबिवलीत एक बैठक.  आम्हा पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना डोंबिवलीला जाणे म्हणजे एखाद्या गावाला जाण्यासारखे वाटते.  पण मनाचा हिय्या करून त्यादिवशी मी वांद्र्याहून डोंबिवलीला जाण्याचे ठरवले. सुधीरही मुलुंडहुन आला.

बैठकीमध्ये संयोजकांची पहिल्यांदाच समोरासमोर गाठभेट झाली. आतापावेतो आमचा संयोजकांबद्दलचा आदर, प्रत्यक्ष न भेटताही, भरपूर वाढला होता.  विशेषतः शेवटच्या फेरीत त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे.  आत्तापर्यंत फक्त जी नावे माहीत होती, त्यांना चेहरेही त्या मीटिंगमध्ये बहाल झाले.meeting2

बैठकीत नक्की कळलेल्या गोष्टी म्हणजे उत्तररंगात तीन टप्पे होते. पहिला टप्पा क्वार्टर फायनल, उपउपांत्य फेरी.  त्याच्यात नऊच्या नऊ संघ भाग घेणार होते आणि चार संघ बाद होऊन पाच संघ पुढच्या टप्प्यात, सेमीफायनलमध्ये, जाणार होते.  सेमीफायनलमध्ये दोन संघ बाद होऊन शेवटच्या टप्प्यात, फायनलमध्ये, दोनच संघ उरणार होते.  त्यातून एक संघ विजेता ठरणार होता.

प्रत्येक टप्प्यामध्ये एकाहून अधिक फेऱ्या, राउंड्स, होणार होत्या, आणि प्रत्येक फेरीमध्ये संघांना गुण मिळणार होते.  मात्र त्या फेर्‍या काय असणार होत्या, याबद्दल संयोजक कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते.  बैठकीला आलेल्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारूनही ह्याच्या पलीकडे जास्त काही माहिती आम्हाला मिळू शकली नाही. थोडक्यात,  परीक्षक पेपर फोडायला तयार नव्हते.  मात्र एक वचन मिळाले ते म्हणजे सगळ्या फेर्‍या खूप मजेदार, आनंददायी असणार होत्या.meeting1

दुसरी मिळालेली महत्त्वाची बातमी म्हणजे कार्यक्रम संबंध दिवस, सकाळी साडेआठ पासून संध्याकाळी सात पर्यंत चालणार होता.  आत्तापर्यंत आमची अपेक्षा होती की साधारणपणे अर्धा दिवस कार्यक्रम चालेल आणि दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही मोकळे होऊ.

याच वेळी आम्ही इतर संघांच्या ही प्रथमच आमने सामने आलो व इतर संघ पाहून थोडेसे दबकलोच. त्या थोड्याश्या संवादातून आम्हाला इतर संघ आमच्याहून जास्त तयारीचे, मेहेनती आणि वरचढ वाटले.

बैठकीनंतर आमच्या संघामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या.  विषय एकच, उत्तररंगात भाग घ्यायचा की नाही?  एक तर रविवारी मिळणारी एक सुट्टी दूर देशी डोंबिवलीमध्ये जाऊन घालवायची का?  दुपारच्या झोपेचे काय?  होणाऱ्या दगदगीचे काय?  रविवारी करायच्या कामांचे काय?

बराच काळ चर्चा झाल्यावर आम्ही एका निष्कर्षाला पोहोचलो.  इतर संघ इतक्या तयारीचे असल्यामुळे आपण काही क्वार्टर फायनलच्या पुढे जाणार नाही.  त्यामुळे क्वार्टर फायनल नंतर जेवून दुपारी झोपायला घरी परत येऊ असे ठरवून “आलं अंगावर तर घेऊ शिंगावर” म्हणत आम्ही उत्तररंगाला जाण्याचे ठरवले.

झालं!  उत्तररंगाचा दिवस उजाडला.  24 नोव्हेंबर!  आम्ही सकाळी पावणेसातला वांद्र्याहून निघून वेळेत कार्यक्रम स्थळी पोहोचलो.  सुयोग मंगल कार्यालय. कार्यालयाची सजावट मात्र अगदी साहित्ययात्री मधल्या “यात्री” ह्या शब्दाला धरून केलेली होती.  कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन गुढकथा इत्यादी साहित्यातल्या वेगवेगळ्या स्टेशनचे बोर्ड लावले होते.  स्पर्धकांच्या नावाचे बिल्लेही रेल्वेच्या तिकिटाच्या प्रमाणे छापलेले होते. प्रत्येक संघाकरता त्यांची टेबले त्यांच्या त्यांच्या संघाची नावे लिहून तयार होती. साहित्ययात्री ह्या थीम प्रमाणे संघांची नावेही रेल्वे इंजिनांवर लिहिली होती.

img_20191124_092209सर्व संघ वेळेत हजर नसल्याने स्पर्धा थोडी उशिरा सुरू झाली.  क्वार्टर फायनल मधली पहिली फेरी होती झटपट फेरी. प्रत्येक संघाला त्यांनी निवडलेल्या पुस्तकावर दहा प्रश्न विचारण्यात येणार होते.  दहा प्रश्नांची उत्तरे देण्यास तीन मिनिट एवढा वेळ होता.  जर उत्तर माहित नसले तर संघ त्या प्रश्नास पास म्हणून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकत होता.  तीन मिनिटांच्या आत सर्व प्रश्न संपले तर पास म्हटलेल्या किंवा चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास संघाला परत संधी होती.

प्रत्येक संघाने निवडलेल्या पुस्तकावर संयोजकांनी बारकाईने अभ्यास करून प्रश्न काढलेले होते.  तुम्ही ते पुस्तक किती सखोल वाचले आहे, याची परीक्षा घेणारेच ते प्रश्न होते.  क्वचित एखादा प्रश्न मात्र सखाराम गटणे यांनी पुलंच्या सगळ्या साहित्यातून शोधून काढलेल्या बोधवाक्याप्रमाणे थोडासा असंबद्ध होता. पण एकंदरच संयोजकांनी हे प्रश्न काढण्याकरता घेतलेली मेहनत अवाक करून टाकणारी होती.

ह्याशिवाय निवडलेल्या पुस्तकावर यादी स्वरूपाचे उत्तर असलेला ही एक प्रश्न प्रत्येक संघाला विचारण्यात येत होता. यादीमध्ये चार उत्तरे अपेक्षित होती. संपूर्ण यादी बरोबर दिल्यास पाच गुण अथवा यादीतील प्रत्येक बरोबर उत्तरास एक गुण याप्रमाणे मार्क होते.img_20191124_091130

या फेरीत आमची चिमणरावाचे चऱ्हाट हे पुस्तक निवडण्याची स्ट्रॅटेजी बरोबर चालली.  वाचनाच्या श्रमविभाजनामुळे आम्ही जवळपास सर्वच प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊ शकलो.  आमचे दुसरे धोरण होते ते म्हणजे शंका असलेल्या प्रश्नाला पटकन पास म्हणण्याचे.  त्यामुळे दहाही प्रश्न एका मिनिटातच संपले आणि न आलेल्या प्रश्नांबद्दल चर्चा करून उत्तरे देण्यास अधिक वेळ मिळाला.

नंतरची फेरी होती “आद्याक्षरी”.  पडद्यावर एक अक्षर दाखवले जाई. त्या अक्षरा पासून चालू होणारी कुठलीही साहित्यकृती आणि तिचे लेखक सांगणे हे अपेक्षित होते. प्रत्येक संघाला एका अक्षरासाठी सुरुवात करायची संधी मिळणार होती आणि त्याच्या नंतर क्रमाक्रमाने प्रत्येक संघाने त्यांचे उत्तर द्यायचे होते.  वेळ अर्थातच मर्यादित होता. एखाद्या संघाने आधी दिलेले उत्तर परत दिले, तर गुण मिळणार नव्हते.  हे मोठेच आव्हान होते. ज्याप्रमाणे दोन डाव घेऊन बदाम सत्ती खेळताना आपण एक पान लावायचे ठरवून ठेवतो पण आपल्या आधी पाळी असलेला खेळाडू तेच पान लावून टाकतो, तशीच अवस्था मधूनमधून होत होती.  ग अक्षर आले असताना आम्ही गणगोत हे नाव ठरवून ठेवले होते.  पण आमच्या अगदी आधीच्या संघाने तेच नाव सांगितले आणि ऐन वेळी दुसरे कुठलेही नाव न सुचल्यामुळे आम्ही तेच नाव सांगून गुण घालवले.

पुढची फेरी होती “प्रश्न पंचविशी”. एकंदरीतच फेऱ्यांची नाव अभिनव आणि क्रिएटिव होती.  अंताक्षरी झाली आद्याक्षरी, वेताळ पंचविशी झाली प्रश्न पंचविशी.  या फेरीमध्ये एकंदर 25 प्रश्न पाच-पाच प्रश्नांच्या गटाने स्क्रीनवर दाखवले गेले.  उत्तरपत्रिकेमध्ये फक्त एक ते पंचवीस आकडे लिहिले होते.  त्या त्या प्रश्न क्रमांका समोर त्या प्रश्नाचे अचूक उत्तर लिहिणे अपेक्षित होते. पहिल्यांदा प्रत्येक पाच प्रश्नांचा गट तीन मिनिटाकरता दाखवला आणिक सगळे प्रश्न संपल्यावर परत प्रत्येक संच 30 सेकंद दाखवला.  याप्रमाणे काही हुकलेल्या प्रश्नांना परत उत्तर देण्याची संधी मिळू शकत होती.  सर्व प्रश्न मराठी साहित्या संबंधी होते पण त्यांच्यात प्रचंड वैविध्य होते.  आमच्या संघाच्या ह्या फेरीतील एकंदर परफॉर्मन्स बद्दल आम्ही जरा साशंकच होतो.  या फेरी बरोबरच आमची खुल्या गटाची क्वार्टर फायनल संपली.

खुल्या गटाबरोबर युवा गटाची पण वेगळी स्पर्धा होती.  त्याच्यामध्ये चार संघ सामील झाले होते.  आमच्या फेरीच्या पाठोपाठच त्यांची सेमीफायनल होती.  त्यांच्या सेमीफायनलमध्ये ही विविध फेऱ्या होत्या. एकंदरीतच युवा गटाची तयारी बघून आम्ही थक्क झालो.  तरुण पिढी वाचत नाही असे आपण सतत बोलतो, ऐकतो.  पण ह्या स्पर्धकांनी आमचा तो समज पूर्णतः खोटा पाडला. सर्वच मंडळी पूर्ण तयारीनिशी स्पर्धेला उतरली होती आणि आमच्या पिढीतले लेखक आणि आम्ही न ऐकलेले लेखक अशा सर्व लेखकांच्या साहित्याशी परिचित होती.

क्वार्टर फायनल संपली आणि आम्ही सगळे जेवायला गेलो.  संयोजकांनी उत्तम, रुचकर भोजनव्यवस्था केलेली होती. भोजन आटपून परत वर सभागृहात येईस्तोवर दोन वाजले.  तोपर्यंत संयोजकांनी सर्व संघांच्या वेगवेगळ्या फेऱ्यांचे गुण मांडून क्रमांक लावलेले होते आणि आम्ही चक्क चौथ्या क्रमांकावर आल्यामुळे सेमीफायनल करता पत्र ठरलो होतो. आमचा दुपारी जेवणानंतर घरी परत जाण्याचा बेत मात्र बोंबलला!

आता पाच संघ उरल्यामुळे संघांची बसण्याची व्यवस्था थोडी बदलली. फेऱ्यांमध्ये जसे वैविध्य वाढले त्याप्रमाणेच काठिण्य पातळीही वाढली.  आता आल्या काही बझर राऊंड आणि मधून मधून आले निगेटिव्ह मार्किंग.  बरोबर प्रश्नास दहा गुण तर चुकीच्या प्रश्नास उणे पाच गुण.  ह्या टप्प्यात फेऱ्याही जास्त होत्या आणि त्या अत्यंत अभिनव होत्या.  “शब्दडोके” हे मराठी साहित्याविषयीचे शब्दकोडे किंवा “काव्यपुर्ती” ही दिलेल्या कवितांमध्ये गाळलेल्या ओळी भरण्याची फेरी ही वानगीदाखल काही उदाहरणे.  ही फेरी पटापट संपली आणि त्याच्यापाठोपाठ युवा गटाची फायनलची फेरीही संपली.

थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला. आणि अहो आश्चर्यम! आम्ही सगळ्यात वरच्या दोन नंबर मध्ये होतो!  फायनलच्या स्टेज करता पात्र ठरलो होतो.  बाळपणी शाळेत असताना पाठ केलेल्या कविता हेच आमच्या यशाचे रहस्य होते यावर आम्हा सगळ्यांचे एकमत झाले.

यावेळेपर्यंत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, सुप्रसिद्ध आणि दिग्गज लेखिका डॉ. विजया वाड यांचेही आगमन झाले होते. त्याचप्रमाणे आमच्या पूर्वरंगांमधल्या फेऱ्यांचे सर्व परीक्षकही कार्यालयात उपस्थित झाले होते. थोड्याच वेळात आमच्या संघात आणि दुर्गाबाई भागवत संघात अंतिम फेरी चालू झाली.

फायनल मध्ये फेऱ्या आणखीनच वेगळ्या होत्या.  “हे कोण बोलले बोला”  ही दिलेल्या उताऱ्या किंवा कवितेवरून लेखक किंवा कवी ओळखण्याची फेरी आम्हाला विशेष भावली. त्याशिवाय ह्या टप्प्यामध्ये पुस्तक आणि लेखकांच्या पलीकडे जाऊन पुस्तकांचे प्रकाशक, मुखपृष्ठे आणि मलपृष्ठे, लेखकांनी पुस्तकांच्या केलेल्या अर्पणपत्रिका, तसेच लेखकांचे खाजगी जीवन, त्यांची नातीगोती ह्याबद्दलही फेऱ्या होत्या.  इथे सगळ्याच बझर राउंडस होत्या आणि सगळ्याच फेऱ्यांना निगेटिव्ह मार्किंग होते.  या टप्प्यामध्ये आम्हाला आमच्या ज्ञानाप्रमाणेच आमच्या स्ट्रॅटेजीनेही मदत केली.  जर उत्तर बरोबर असण्याची बऱ्यापैकी खात्री असेल, तरच उत्तर देण्याचे आमचे धोरण यशस्वी ठरले.  जेव्हा फेऱ्या संपल्या तेव्हा जरी गुण जाहीर झाले नव्हते तरीही आम्ही जिंकलो आहोत याची आम्हाला खात्री होती.

एकीकडे आमच्या दोन्ही संघांच्या गुणांचे संकलन चालू असता व्यासपीठ तयार होत होते.  सर्व मान्यवर स्टेजवर स्थानापन्न झाले आणि सोहोळयाला सुरवात झाली. प्रथम ध्रुव वेल्फेअर सोसायटीच्या विनोद देशपांडे सरांनी संस्थेची आणि त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  संयोजकांनी स्पर्धेच्या कल्पनेपासून ते आजपर्यंतच्या मार्गक्रमणेची माहिती दिली. तत्पश्चात देशपांडे सरांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सत्कार झाले. यानंतर परीक्षकांनी त्यांचे परिक्षणातले अनुभव कथन करून सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागानेही मदत केली होती.  शासनातर्फे श्रीमती राजश्री बापट     आल्या होत्या. त्यांनीही स्पर्धेच्या कल्पनेचे आणि आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी सर्व उपस्थितांना पुस्तकांच्या गावाला भेट द्यायचे आवाहन केले.

मग विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.  युवा गटातून जिंकलेला संघ होता “शब्दगंध” संघ आणि खुल्या गटातून जिंकलेला संघ होता “पु. ल. देशपांडे” संघ. आम्ही!  टाळ्यांचा कडकडाटात आम्ही विजयाबाईंकडून बक्षीस स्वीकारले.  क्वार्टर फायनल नंतर घरी परतण्याचा प्लॅन केलेले आम्ही, स्पर्धेचे विजेते ठरलो होतो.

img_20191124_192417

विजया वाड ह्यांच्याकडून पारितोषिक स्वीकारतांना

त्यानंतर विजयाबाईंनी एक खूप गोड भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी विजेत्यांचे नाही तर सर्वच स्पर्धकांचे अभिनंदन केले.  त्याच बरोबर एक women empowerment चा, महिला सबलीकरणाचा एक खंबीर संदेश दिला. विनोद देशपांडे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

आम्हा सर्वांकरता ही साहित्ययात्रा फारच आनंदमय झाली.  पण आम्ही तर यात्रेकरू होतो.  आंम्हाला ही यात्रा घडवली स्पर्धेच्या संयोजकांनी.  त्यांचे शतशः आभार.  आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.

मग काय वाचकहो, येताय ना साहित्ययात्री 2020 ला?

sanyojak

स्पर्धेचे संयोजक

This entry was posted in Books, Books, Reading, General, Reading. Bookmark the permalink.

14 Responses to आम्ही साहित्ययात्री

  1. Nomadosauras says:

    Congratulations, sir 🙂

  2. Shubham Edekar says:

    मस्त लिहलंय सर. वाचून मजा आली आणि साहित्ययात्रा नक्की काय होतं तेही समजलं.

  3. Michael B Packard says:

    Makarand, glad to see you are still “musing”. i had not seen one for quite some time. however, i have no idea what you were musing since i only read english. i assume from the family pictures, all is going well for you. i did follow your path (literally) and ran the Mumbai Half Marathon with Bonnie in 2014. i was well under-trained, but made it. quite an adventure – the only half-marathon i have or will run.
    take care and keep musing, mike packard

    • Good to hear from you Mike.
      I participated in a literary context with my family, and won it. This post was about it.

      BTW, I knew about your half marathon run, as I was the one who managed entries for you and Bonnie. 🙂

      Again, great to hear from you.

  4. मस्त! ‘विश्वस्त’चा असा उल्लेख पाहून मजा आली!

  5. 26pa says:

    Nice to know about such initiative Hope this inspires you to write your autobiography !

  6. अनिकेत says:

    अप्रतिम मांडणी, मस्त लिहिलंय सर.

  7. Renuka says:

    मस्त अनुभव.. congratulations

  8. संजय दातार says:

    खूप छान.

  9. क्षितिजा महाजन says:

    खूप छान लिहिलंय.ते वाचून स्पर्धेचा जो आनंद तुम्ही अनुभवलात त्याची थोडीशी अनुभूती आम्हालाही आली.

Leave a comment