ब्लॉग म्हणजे काय रे भाऊ?

Maharashtra Times, one of the leading daily newspaper in Marathi has asked me to write a column about the blogs. Blogs Up is the name of the column and it will appear every alternate week. I will be reviewing various blogs in the column. I am so thrilled! The first article in the series was a backgrounder and appeared on last Sunday. It was slightly edited because of space constraint. Here is a link to the published article. But since blogs don’t have space constraint, I am publishing the unedited version here. 🙂

pplया सदरामध्ये पुढच्या काही आठवड्यात आपण वेगवेगळ्या ब्लॉग्सची सफर करणार आहोत. पण मला वाटते  की  त्याआधी ब्लॉग म्हणजे नक्की काय असतो हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. ब्लॉग हा शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे, पण “ते काहीतरी इंटरनेटवर असते” ह्या पलीकडे आपल्याला त्याबद्दल किती माहिती आहे?

ब्लॉग म्हणजे काय हे समजून घेण्याकरता आपण प्रथम बातम्या किंवा विचार कसे प्रसारीत होतात हे जाणून घेऊ. प्रसारमाध्यमे बातम्या किंवा विचार लोकांपर्यंत पोचवतात. एखादा बातमीदार किंवा प्रस्थापित लेखक वृत्त किंवा लेख निर्माण करतो आणि मग संपादकीय टीम त्यांच्या निकषांवर उतरणाऱ्या गोष्टींना प्रसिद्धी देतात. अशा प्रकारे प्रसिद्धीची मक्तेदारी काही मोजक्याच लोकांच्या हातात केंद्रित होते. पण तुमच्या आमच्या सारख्यांचे काय?  आपल्यालाही मते आणि विचार असतात. आपल्या आयुष्यातही अविस्मरणीय घटना घडतात. आणि हे सर्व लोकांपर्यंत पोचावे अशी आपलीही इच्छा असते. हे कसे होणार? अशावेळी ब्लॉग्स आपल्या मदतीस धावून  येतात.

माझ्या मुलीने स्वत:च ठरवून तीचा अठरावा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. माझ्या मते ही एक अनुकरणीय गोष्ट आहे आणि प्रत्येक वयात येणाऱ्या व्यक्तीने हे केले पाहिजे. पण मी हे लोकांपर्यंत कसे पोचवणार? मी ही घटना माझ्या ब्लॉगवर प्रसिध्द केली. ती बऱ्याच लोकांपर्यंत पोचली, आणि त्याचे पर्यवसन आमच्या ऑफिसच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर भरवण्यात झाली. काही तरुण मुलांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करायचे ठरविले. माझ्या ब्लॉगच्या गैरहजेरीत हे काहीच घडले नसते.

ब्लॉग हा शब्द “वेब लॉग” मधल्या “वे” ला वगळून बनला आहे. “वेब लॉग” चा शब्दशः अर्थ “वेब वरची नोंदवही”. ब्लॉग हे एक नव्या प्रकारचे माध्यम, neo media, आहे. ब्लॉग्समुळे  आपल्या पैकी प्रत्येकाला बातमीदार, लेखक आणि प्रकाशक होणे शक्य झाले आहे. ब्लॉग ही एक विशिष्ट प्रकारची वेबसाईट असते, जी कोणीही चकटफू (फुकट) बनवू शकतो. एखादा व्यवसायीक त्याच्या व्यवसाया विषयी ब्लॉग बनवू शकतो, किंवा एखादे आजोबा त्यांच्या नातवंडकरता ब्लॉग द्वारे गोष्टी सांगू शकतात. एखादा अमिताभ त्याच्या चाहत्यांबरोबर संपर्कात राहू शकतो, तर एखादी पहिलटकरीण तिच्या मातृत्वाचे नवनवीन अनुभव मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या इतर मुलींबरोबर शेअर करू शकते.

विचार करणारा आणि ते शेअर करण्याची इच्छा असलेला कोणीही आपला ब्लॉग चालू करू शकतो, आणि सहजपणे आपले विचार प्रकाशीत करू शकतो. त्या विचारांकारिता वाचक मिळवणे हा एक वेगळाच विषय आहे, आणि तो ह्या सदरात केंव्हातरी हाताळूयाच. त्याप्रमाणेच जर वाचकांना कुतूहल असेल, तर स्वतःचा ब्लॉग  कसा बनवायचा ह्याचाही आढावा आपण इथे घेऊ.

ब्लॉग लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणतात तर ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगींग. ब्लॉगवरच्या प्रत्येक लेखाला किंवा नोंदीला ब्लॉगपोस्ट किंवा नुसतेच पोस्ट असे म्हणतात. वर्ड किंवा तत्सम इतर कुठलाही प्रोग्राम वापरता येणारा कोणीही ब्लॉगपोस्ट्स लिहू शकतो.

बहुतेक ब्लॉग्स हे ऑनलाईन डायरीच्या स्वरुपात असतात. हा एक मोठ्ठाच  विरोधाभास आहे. डायरी ही अत्यंत खाजगी असते, तर ब्लॉग्स अगदी जगजाहीर, सर्वांना वाचता येण्यासारखे. संभाषणात कोणालाही सांगणार नाही अशा स्वत:च्या आणि इतरांच्या अनेक खाजगी गोष्टींची ब्लॉगर्स  आपल्या वैय्यक्तिक ब्लॉग्सवर अनावधानाने नोंद करतात. ह्यातूनच अनेकवेळा गुप्तता भंगाच्या (breach of privacy) समस्या निर्माण होतात.

एखाद्या डायरीत किंवा वहीत लिहिताना आपण पुढच्या पानावर लिहित जातो, त्यामुळे सर्वात नवीन लिहिलेली गोष्ट वहीच्या तळाला असते. ब्लॉगवर मात्र प्रत्येक नवीन नोंद सगळ्यात वर जातो. त्यामुळे ब्लॉगवर येणाऱ्या कोणालाही नवीन गोष्टी अपोआप दिसतात.

वर्तमानपत्रात किंवा टेलिव्हीजन वर प्रसिद्ध होणारी गोष्ट अत्यंत अल्पजीवी असते. आजच्या वृत्तपत्राची उद्याच रद्दी होते, आणि लाइव्ह टेलिव्हीजन सहजासहजी रिप्ले करता येत नाही. पण ब्लॉग मात्र इंटरनेटवर असल्यामुळे चिरंजीव असतो.

पारंपारिक माध्यमे एक दिशा मार्गाप्रमाणे असतात. ती फक्त विचार प्रसारित करू शकतात, पण चर्चेचा अवसर सहजपणे देऊ शकत नाही. “वाचकांची पत्रे” किंवा “दर्शकाचा फोन” ह्या गोष्टी संभाषणाची अत्यंत मर्यादित  संधी देतात. ब्लॉगवरची प्रत्येक नोंद मात्र एक संवाद होऊ शकतो. वाचक प्रश्न विचारू शकतात, किंवा त्यांचे विचार मांडू शकतात, आणि लेखक त्यांना प्रतिसाद देऊ शकतो.

सेठ गोडीन, सुप्रसिद्ध मार्केटिंग गुरू, त्याच्या Tribes : We need you to lead us ह्या पुस्तकात नायकांना, लीडर्सना  समान विचारांनी भारून गेलेल्या, एकच तळमळ असलेल्या लोकांच्या जनजाती, tribes,बनवून जग बदलून टाकण्याचे किंवा नवे जग बनवण्याचे आवाहन करतो. स्वतःची कुळी  बनवण्याकरता ब्लॉग हे एक उत्तम साधन आहे, कारण ब्लॉग प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा  देतात आणि त्यांचा स्वत:चा युनिक श्रोतृवर्ग बनवण्यास मदत करतात.

आत्ता पर्यंत सांगितलेल्या काही गोष्टी फेसबुकलासुद्धा लागू होतात. मग फेसबुक आणि ब्लॉग्स मध्ये फरक तो काय?    सर्वसामान्यपणे ब्लॉगपोस्टस मोठे असतात तर फेसबुक वरचे पोस्ट बरेच लहान, सूक्ष्म (micro) असतात, त्यामुळे फेसबुकला मायक्रो ब्लॉगिंग साईट असे म्हणतात. ब्लॉग्स, फेसबुक, युट्यूब, ट्विटर इत्यादी मधले एक समान तत्व म्हणजे ह्या सर्व सुविधा प्रसारमाध्यमांची मक्तेदारी मोडून काढतात आणि कोणाही इच्छुकाला त्याचे म्हणणे प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य देतात. ह्या प्रकारे निर्माण झालेल्या साहित्याला “सर्वानिर्मित साहित्य” (user generated content) म्हणून संबोधित केले जाते.

जस्टीन हॉल हा आद्य ब्लॉगर म्हणून ओळखला जातो. त्याने १९९४ साली,कॉलेज शिक्षण चालू असतानाच links.net ही त्याची वेब डायरी चालू केली. १९९७ मध्ये Jorn Barger ने “वेब लॉग” ह्या नावास  जन्म दिला, आणि एप्रिल १९९९ मध्ये Peter Merholtz ने “वे” वगळून त्याला ब्लॉग म्हणण्यास सुरवात केली.

सुरवातीला ब्लॉग बनवण्याची  व पोस्ट  करण्याची साधने फक्त संगणकीय तज्ञानी वापर करण्यायोग्य होती आणि त्यामुळे ब्लॉग्सची संख्याही मर्यादित होती. हळूहळू ती सुलभ होत गेली आणि सर्वसामान्य लोकांनाही सहज वापरता येऊ लागली. १९९९ साली “ब्लॉगर” ही लोकप्रीय आणि  मोफत ब्लॉग निर्माण करण्याची सेवा चालू झाली. त्याच्याच आगेमागे “ओपन डायरी”, “लाइव्ह जर्नल” ह्या सेवाही उपलब्ध झाल्या.आणि मग ब्लॉग्स भूमितीय गतीने वाढू लागले. आजघडीस जगात नक्की किती ब्लॉग्स आहेत हे सांगणे कठीणच आहे, पण काही प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, जुलै २०११ मध्ये १६ कोटींहून जास्त ब्लॉग्स अस्तित्वात होते.

ब्लॉग्सचा उदय जरी पारंपारिक प्रसारमाध्यमाना पर्याय म्हणून झाला असला, तरी आता ह्या दोघांमधला  फरक काही बाबतीत अस्पष्ट होऊ लागला आहे.  ब्लॉग्स मधले लिखाण हे बहुतेक वेळा अव्यवसायिकांनी केलेले असते.  त्यामुळे बरेच  तज्ञ त्याच्या अचूकते बद्दल साशंक  असतात. असे असले तरी बरेचदा वाचक संस्थापित माध्यमांपेक्षा ब्लॉग्सवर अधिक विश्वास टाकतात.

ब्लॉग्सवर  काहीही संपादकीय संस्कार होत नसल्यामुळे हे लिखाण सर्वसामान्य वाचकांकरता  कितपत योग्य आहे याच्याबद्दलही तज्ञांची  खात्री नसते. कधीकधी ह्या  संपादकीय फिल्टरची अनुपस्थितीच एखाद्या पत्रकाराला ब्लॉग्स कडे आकर्षित करते. हे लक्षात घेऊन आता बऱ्याच वृत्तसंस्थांनी आपले आपले ब्लॉग्स चालू केले आहेत.

ब्लॉगर पत्रकार झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अनेक ब्लॉग्स पुस्तकात रुपांतरीत झाले आहेत, तर “ज्युली & ज्युलिया” हा संपूर्ण हॉलीवूड चित्रपटच ज्युली पॉवेलच्या ब्लॉगवर आधारित आहे.

ब्लॉग हे एक दृकश्राव्य (मल्टीमेडिया) माध्यम आहे. त्यामुळे एकाच ब्लॉगपोस्टमध्ये मजकूर, ध्वनी आणि विडिओ जरुरी प्रमाणे वापरता येतात . ही सर्व माध्यमे एकाच वेळेस वापरून एखाद्या कौटुंबिक सहलीचा अल्बम, किंवा एखाद्या चित्रपटाचे परीक्षण इत्यादी अत्यंत आकर्षक प्रकारे प्रसिद्ध करता येते. आता तर ब्लॉग्स हे केवळ लिखाणापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. मोबाईल आणि वेब कॅमेऱ्याच्या विस्तृत प्रसारामुळे आता विडिओ ब्लॉग्स सुद्धा वेगाने पसरू लागले आहेत.

व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक ब्लॉग हा त्याच्या कर्त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, आणि त्यामुळेच कुठलाही एक ब्लॉग दुसऱ्या ब्लॉग सारखा नसतो. ब्लॉग लिहिण्यामागची प्रत्येकाची प्रेरणा पूर्णपणे वेगळी असते. २०११ सालच्या technorati च्या सर्वेनुसार ६० टक्क्याहून जास्त ब्लॉगर हे हौशी खेळाडू आहेत, तर ५ टक्के लोक त्यांची उपजीविका ब्लॉग्स लिहून करतात. ब्लॉग करण्यामागचा सगळ्यात प्रबळ हेतू  “आपले ज्ञान व अनुभव जागाबरोबर शेअर करणे”. इतर काही महत्वाच्या कारणांची यादी अशी.

* आपल्या आवडीच्या विषयामध्ये आपली मते व्यक्त करणे

* आपल्या कळकळीच्या कार्याला हातभार लावणे

* समविचारी लोकांशी संपर्क साधणे

* व्यावसायिक मान्यता मिळवणे

ब्लॉगच्या विषयातही अमाप विविधता आहे. बातम्या आणि समाचार, राजकारण, प्रवास, तंत्रज्ञान, करमणुकीची साधने, सिनेमा, प्रसिध्द व्यक्ती, त्यांचे जीवन आणि मते इत्यादी इत्यादी इत्यादी. ब्लॉग्सचे विश्व हा आपल्या जगाचाच आरसा आहे.

पुढचे काही आठवडे आपण सर्व ह्या ब्लॉग्सच्या दुनियेचा फेरफटका करणार आहोत. दर लेखात काही निवडक, वैशिष्टपूर्ण ब्लॉग्सशी मी तुमचा परिचय करून देईन. हे ब्लॉग्स निवडण्याकरता आपण सर्व, ब्लॉग्स, ब्लॉग्सचे विषय इत्यादी सुचवून मदत करू शकाल. हे सदर जितके माझे आहे तितकेच तुमचेही. आपल्या अभिप्रायांची व सूचनांच्या प्रतीक्षेत

Advertisements
This entry was posted in Fundas, General, Science / Technology. Bookmark the permalink.

8 Responses to ब्लॉग म्हणजे काय रे भाऊ?

 1. Manoj Borgaonkar says:

  आपले पुढील ब्लॉग विषयीचे लेख कशे वाचण्यास मिळतील ते कळवा सर

  • मनोज सर

   माझे ब्लॉग्स अप हे सदर महाराष्ट्र टाईम्स मध्ये दोन वर्षापूर्वी दर दोन आठवड्यांनी प्रसिद्ध होत असे. बाकी लेखांच्या लिंक्स आत्ता माझ्याकडेही नाहीत, पण त्यांची कात्रणे माझ्या बायकोने सांभाळून ठेवली आहेत.

   ह्या वर्षीच्या महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकात माझा “सोशल साईट्सचे अर्थकारण” हा लेख प्रसिद्ध झाला होता. तोही तुम्हाला आवडेल असे वाटते. वाचून अभिप्राय द्यावा.

   मकरंद

 2. Manoj Borgaonkar says:

  महाराष्ट्र टाईम्स मधला ब्लॉग्ज अप हा लेख आवडला. या लेखातून डीजीटल इंस्पीरेशन आणि टेकवर्म या ब्लॉग्जविषयीची खूप उपयुक्त माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.मी प्राथमिक शिक्षक आहे.सध्या digital शाळा व ब ब्लॉग विषयी चर्चा चालू आहे. म्हणून ब्लॉग विषयी सर्च केल्यावर आपली माहिती उपयुक्त धरणार आहे.
  धन्यवाद

 3. Pingback: ब्लॉग म्हणजे काय? - Virtual KideGiri

 4. B G Limaye says:

  Dear Makarand Karkare..
  Please check my Marathi calligraphy blog http://www.calligraphicexpressions.blogspot.com where I have been posting old and new Marathi poems in my calligraphy
  This is small effort to spread beauty of Marathi Literature across world, and pay tribute to Poets, musicians, singers who made our lives beautiful. I have tried to write more than 390 best poems from Marathi literature and trying to express them through calligraphy.. hope you may like this..

  Please have a look
  Regards
  BG Limaye
  Pune

  • Limaye Saheb

   Your work is excellent, and deserves to be brought to people’s notice. I will write about it, just can’t commit any exact timeline at present.

   Thanks for sharing.
   Makarand

 5. Aparna Parab says:

  आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधला ब्लॉग्ज अप हा लेख आवडला. या लेखातून डीजीटल इंस्पीरेशन आणि टेकवर्म या ब्लॉग्जविषयीची खूप उपयुक्त माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. मी ग्रंथपाल असून तुम्ही ग्रंथालयशास्त्र किंवा शिक्षणक्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयासंबधित अशा ब्लॉग्जची माहिती आपल्या लेखातून आमच्या सारख्या वाचकांना पुरवावी.

  धन्यवाद.

  अपर्णा परब

  • धन्यवाद अपर्णा.

   आपण सुचवलेल्या विषयांवरील ब्लॉग्स बद्दल लिहिण्याचा जरूर प्रयत्न करीन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s